meaning of marriage

लग्न म्हणजे नेमकी काय ?

Spread the love
लग्न म्हणजे नेमकी काय ?

लग्न!!!!! लग्न म्हटलं की, एक उत्सुकता, एक ओढ, एक अनामिक हुरहूर, व्याकुळता, या गोष्टी येतातच. भरपूर लोक म्हणतात की, आता  आधुनिक काळात  या भावनिक गोष्टींना फारसं महत्व नाहीये.. पण खरंच असे आहे का?? मुलगा असो किंवा मुलगी, दोघेही अगदी प्रोफेशनल असो किंवा शेतकरी नकळत ती ओढ असतेच, हा आता लोकं स्वतःच्या भावना लपवतात त्यामुळे हे दिसून येत नसेल..मुलगा असो किंवा मुलगी किंवा त्यांचे आई वडील यांच्या लग्नाकडून खूप काही अपेक्षा असतात, अर्थात यात वाईट असं काहीच नाही.. पण त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करून हि लग्न टिकलं नाही तर त्यासारखं दुःख नाही, आणि आयुष्यभराचा तिरस्कार, त्रास या तर वेगळ्याच गोष्टी..

लग्न कसे असावे?? अरेंज कि लव्ह?? आता यात खूप खोलवर गेलात तर फसवणूक हि दोन्हीकडून होण्याची शक्यता असतेच.. प्रेम करताना भरपूर लोक स्वतःची खरी माहिती लपवून स्वतःच्या बोलण्यात समोरच्या व्यक्तीला अक्षरशः वेडे करतात पण हीच लोक लग्न झाल्यावर एकमेकांना मारायलाही कमी करत नाही, आणि काही जण तर असे प्रेमवेडे असतात की कितीही अडथळे आले तरी त्याला पार पाडून अपनी नौका पार लगाते ही हैं..तसेच अरेंज मॅरिज मध्येही हा धोका असतोच , त्यासाठी विश्वासाहर्ता अगदी महत्वाची.. थोडक्यात सांगायचे झाले तर, सध्याच्या काळात विश्वास हि खूप मोठी गोष्ट आहे..पण जर हि विश्वासाहर्ता आम्ही जपत आहोत तर काहीही वावगे ठरणार नाही..

लग्न किती छान वाटतो हा शब्द लग्नागोदर (काही) मुलींना.. म्हणजे लग्न होण्याअगोदर प्रत्येक मुलीचं तिच्या नवऱ्याविषयी, तिच्या सासरच्या लोकांविषयी काही कल्पना असतात.. पण खरंच त्या इच्छा पूर्ण होतात का हो?? तुम्ही विचारा ना प्रश्न स्वतःच्या मनाला.. आपण एकमेकांना खरंच पाहिजे तसं वागतो का?? एकमेकांसाठी जरासं ऍडजस्ट करतो का?? उत्तर तुमच्या मनातच ठेवा.. तुम्हाला उत्तर मिळालं बस झालं.. सध्या समाजात लग्नाविषयीची अनेक उदाहरणे सापडतील त्यातीलच हि दोन उदाहरणे बघुयात :

  1. ममता व अजय, दोघेही सुशिक्षित.. वधू वर सूचक मंडळातर्फे लग्न जुळलं.. पण ममताच्या आई वडिलांनी एकुलती एक मुलगी म्हणून मुलाची सगळीकडे कसून चौकशी केली. सगळीकडून एकच उत्तर-” मुलगा अगदी चांगला, निर्व्यसनी आहे.( निर्व्यसनी आहे, हे जे खोटं बोलतात ना, त्यांच्या अशी सनकरून कानाखाली द्यावी वाटते ). पण मुलाकडे जरा परिस्थिती वेगळी असते.. मुलाने निक्षून सांगितले असते की, मुलीची चौकशी करायची नाही. झालं सगळ्यांनी होकार दिला.. अजय पुण्याला जॉबला होता, चांगला पगार होता, पण आई वडील अतिशय साधी माणसं जी शेती सांभाळत गावीच राहत होते.. सुनेला ते जास्त दिवस गावी ठेवणार नव्हते कारण नव्या नवलाईचे दिवस आहे म्हणून.. ममता सून बनून आली पण मुलगीच बनून गेली.. सगळ्यांना खूप लळा लावला तिने.. तिला साडी नेसायला जमत नव्हती तर सासूबाई साडी नेसून द्यायच्या.. त्या म्हणायच्या,” तू पुण्यात गेल्यावर जीन्स घाल पण इथे मात्र दिवसभर साडी नेस भलेही काय काम करू नको.” हे दोघे आपले सासू सासरेच आहेत की आई वडील?? असा प्रश्न तिला पडायचा.. गावावरून दोघेही पुण्यात आले, अजयला भरपूर पगार होता, त्यामुळे तिला शिकायचं असलं तरी काय प्रॉब्लेम नव्हता आणि ती घरात राहिली तरी काय प्रॉब्लेम नव्हता.. बघता बघता लग्नाला दहा वर्षे झाली पण अजूनही अजय तिला सकाळचा चहा , भाजी, भांडी घासणे यात मदत करतो, या 10 वर्षात त्याने तिच्यावर एकदाही हात उचलला नाहीये, हा किरकोळ भांडण होतात कधी लांबतात तर कधी लगेच मिटतात..
  2. शरयू आणि रमेश.. दोघेही सुशिक्षित.. नातेवाईकांच्या मध्यस्थीने झालेलं लग्न.. रमेशचा स्वतःचा बिझनेस होता, त्याच्या हाताखाली तीस ते चाळीस लोकं कामाला होती.. शरयू अत्यंत देखणी तेवढीच शांत मुलगी..शिक्षिका होण्याचं स्वप्न होतं तीच, लग्नाअगोदर सासरी सगळे हो म्हटले.. पण लग्न झाल्यावर मात्र सगळ्यांनी हात वर केले.. घरात तिचं वैयक्तिक असं काही मत नव्हतं..रमेश तिला बाहेर घेऊन गेला तरीही फोन लावून आईला विचारणार ,” आई हे खाऊ का आम्ही, इकडे फिरायला जाऊ का?? म्हणजे सगळ्याच गोष्टी काय आईला सांगायलाच पाहिजे का?? हा प्रश्न शरयुला पडायचा..इतका मोठा बिझनेस होता पण बायकोला मोबाईल घेऊन द्यायचा नाही, या मताचा तो.. त्या सगळ्यांच्या अशा वागण्याने ती खचत चालली होती.. त्यातच तिला दिवस गेले.. मुलगा होईल या अपेक्षेने त्यांनी तीन मुली जन्माला घातल्या.. आणि अजूनही मुलगा होईल, या अपेक्षेत ते सगळे आहेत..

वरील दोन्ही उदाहरणांवरून लक्षात येते की, लोकं श्रीमंत असो किंवा गरीब.. त्याचा इथे काही संबंध नाही, तर संबंध आहे तो त्यांच्या वैचारिकतेचा, त्यांच्या So Called Mentally चा.. बरं मी काय म्हणते, असं जगण्यापेक्षा स्वतः आनंदी राहा, दुसऱ्याला आंनद द्या.. सगळेच आंनदी.. उगाच एकमेकांची उणीदुनी काढून कुरापती करायला कोण सांगत काय माहित. लग्न झाल्यावर ऍडजस्ट हे करावंच लागत, जसं साडी नेसता न येताही तिने फक्त सासूसाठी साडी नेसायच ठरवलं.. तसेच शरयूने देखील नोकरी न करता घरात राहण्यात ऍडजस्टच केलं होतं.. फरक होता तो संस्कारांमध्ये.. संस्कार याचेच कि एकमेकांनी समजून उमजून घेऊन राहायचे.. एकमेकांना दुखवायचे नाही..आणि दुसरे संस्कार हेच कि, आमच्या घरातल्या मुली बाहेर नोकरीला जात नाहीत. आणि हि लग्नानंतरची बंधनं घालण्यात खूप मोठा हात असतो , “दुर्दैवाने स्त्रियांचाच, ज्या कि स्वतःला सासू, नणंद, भाऊजय, आत्या, मावशी, आणि आई समजतात.

शेवटी लग्न हे दोघांचं असतं, ते कसं टिकवायचं हे पण दोघांनी ठरवायचं.. लग्नाअगोदरची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुली कोणतंही कष्ट करायला तयार असतील तर नवऱ्यानेही तिला मदत करायला काहीच हरकत नसावी.. शेवटी कसं आहे ना, आयुष्यभर फक्त तुम्हीच एकमेकांना झेलनार आहात.. मग प्रेमाने साथ द्यायची कि भांडणानी हे सर्वस्वी तुमच्यावर असणार आहे..

( वरील दोन्ही कथा खऱ्या आहेत)

खरंच लग्न हि अशी गोष्ट आहे, छान जमून आली ना दोन्ही घरातील माणसं हि समाधानी आणि नवरा बायकोही.. दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांना व्यवस्थित समजून घेतले, मनात कोणतीही आडकाठी न धरता, हे लग्न म्हणजे फक्त एकाचीच जबाबदारी न समजता सगळ्यांनी एकत्र येऊन केलेला उत्सव समजला तर किती तरी गोष्टी अगदी चुटकीसरशी सुटल्या जातील, आणि असे कुटुंब कोणाला नको असेल.

लग्न झाल्यावर घरातल्या व्यक्तींनी जोडप्याला स्पेस देणं हि हि आताच्या धकाधकीच्या जीवनात गरजेचं आहे..नव्या नवलाईचे दिवस त्यातच तर त्यांना त्यांच्या आयुष्याच्या गोड आठवणी बनवायच्या असतात.. पहिला वहिला होणारा स्पर्श, त्याने तिच्याकडे बघितल्यावर तिची होणारी तारांबळ, पाहुण्यांच्या गराड्यात एकमेकांच्या नजरेला आसुसलेले ते दोघे, कामावर गेल्यावर येणारी एकमेकांची आठवण तसेच घरी सगळं आवरल्यावर नजरेनेच तिला त्याच सांगणं,” pls लवकर आवरून ये”, आणि तिने लाजून डोळे मोठे करून,”काही पण” असे नजरेनेच बोलणे, एकमेकांना जमेल तसे गिफ्ट देणे, वाढदिवस साजरे करणे, काही वेळी अबोला धरणे, छोटी छोटी भांडण, याने त्या घराला पूर्णपणे घरपण येत.. आणि या गमतीजमती वाचण्यापेक्षा अनुभवणे हे कधीही चांगलेच ना..

लग्न हि तडजोड किंवा बंधन कधीच नसावं, त्यात एकमेकांच्या मतांचा आदर असावा, एकमेकांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा प्रयत्न असावा, प्रेम असावं पण शंका नसावी ,आदरयुक्त भीतीही असावी, समानता असावी, एकमेकांचं विश्व एकमेकांच्यात असावं, एकमेकांना प्रेरणा द्यावी, कधी कधी माघार पण घ्यावी.. जगासाठी तुम्ही आदर्श बनला नाहीत तरीही चालेल, पण एकमेकांसाठी मात्र तुम्ही नेहमीच आदर्श असावे..

-स्वप्नाली पोवार-जाधव (लेखिका)

Visit – https://lagnajamala.com

Related Posts

2 Replies to “लग्न म्हणजे नेमकी काय ?”

  1. वाचाल तर वाचाल ..
    There are some Awesome thoughts in this Blog.. One must read and apply it in their life.. Understanding and Trust are the keys of Happy life..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *